अखेरची सोबत

“तुमचा मुलगा आलाय बर का ,”नर्सने त्यावेळेस त्या वयस्कर गृहस्थांना सांगितले. त्यांनी डोळे उघडण्यास बराच वेळ लावला ,पण तोपर्यंत ती नर्स परत परत तेच वाक्य बोलत राहिली होती. आदल्या रात्री अती तीव्र हृदय झटका आल्यामुळे त्यांना झोपेच्या गोळ्यांचा मोठा डोस दिलेला होता व ते अर्धवट शुद्धीत होते. ग्लानीमुळे त्यांना समोरची व्यक्ती अस्पष्ट दिसत होती. त्यांच्या पलंगापाशी उभे असलेल्या तरुणाच्या अंगावर नौसेना दलाचा गणवेश दिसत होता .

त्या वृध्द गृहस्थांनी त्याचा हात हातात घेतला. त्या सैनिकांनी त्यांच्या कृश हाताला आपल्या राकट बोटाने घट्ट धरलं व प्रेमाने ,हळुवारपणे त्यांचा हात किंचित दाबला. तेवढ्यात नर्स खुर्ची घेऊन आली व थकलेला तो सैनिक पलंगाजवळ खुर्ची सरकून बसला .

वार्ड मधल्या मिणमिणत्या धुसर प्रकाशात रात्रभर तो सैनिक त्या वृद्धाचा हात हातात घेऊन, त्यांच्याशी धीराने शब्द बोलत राहिला होता. मृत्युपंथाला लागलेल्या त्या वृद्ध व्यक्तीच्या तोंडून एकही शब्द फुटत नाही ,पण क्षीणपणे त्या तरुणाचा हात आपल्या हातात घेऊन ते शांतपणे पडून राहिले होते. ऑक्सिजनच्या नळकांड्यातून येणारा विचित्र आवाज ,विव्हळणारे इतर रोगी ,रात्रपाळीवरच्या कर्मचाऱ्यांची आत बाहेर होणारी हालचाल या सगळ्या गोष्टीकडे लक्षणे लक्ष ही न देता तो निग्रहीपणाने त्या वृद्ध गृहस्था जवळ बसून राहिलाहोता .

ती नर्स जेव्हा प्रत्येक रुग्णाची चौकशी करण्यास येत होती तेव्हा दरवेळी त्या सैनिकाच्या तोंडून निघणारे धिराचे बोल तिच्या कानावर पडत होते. त्या रात्रभरातून तिने अनेक वेळा त्या तरुणाला समजून सांगितलं होतं की ,त्यांनी तिथून उठून बाहेर जाऊन थोडी विश्रांती घ्यावी ;परंतु प्रत्येक वेळी त्याने तसं करण्यास नाकारच दिला होता .

पहाटे पहाटेच्या सुमारास त्या वृद्ध गृहस्थाचं निधन झालं .त्यांचा निर्जीव हात आपल्या हातामधून सोडवून पलंगावर अलगदपणे टेकवून तो नर्सला बोलवण्यासाठी म्हणून वार्ड बाहेर गेला .नर्सने आत येऊन ते निर्जीव शरीर बाहेरच्या खोलीत नेण्याची व्यवस्था केली .त्याबद्दलची कागदपत्र ती तयार करत असताना तो तरुण शांतपणे वार्ड मध्येच थांबून राहिला होता. ती परत आत मध्ये येऊन त्यांचं सांत्वन करू लागणार तेवढ्यात त्याने विचारलं, “काय झाले होते ,कोण होते ते गृहस्थ ?”

आश्चर्यचकित होत ती नर्स त्याला म्हणाली,” कोण म्हणजे? तुझे वडील होते ना ते!”

” नाही ,नाही. ते माझे वडील नव्हते .मी यापूर्वी त्यांना कधीही बघितलेलं ही नव्हतं .”तो उद्गारला.

“मी काल रात्री जेव्हा तुला त्यांच्याजवळ घेऊन गेले तेव्हा तूच मला का नाही बरं सांगितलं?” नर्स ची विचारणा.

“तेव्हा माझ्या लक्षात आलं होतं की, आमच्या छावणी मधून घाई घाईने मला सुट्टीवर पाठवण्यात काहीतरी मोठी चूक घडली होती. त्याचं असं आहे, की आमच्या पलटणीमध्ये आम्ही दोघेजण एकाच नावाची आहोत .शिवाय आम्हाला जो नंबर मिळतो तोही नेमका एक सारखाच मिळालेला होता. दुसऱ्या सैनिकाच्या ऐवजी त्या जागी त्यांनी चुकीनं मला पाठवले.” त्या गृहस्थाने स्पष्टीकरण देऊन खुलासा केला .”परंतु मला कळून चुकलं होतं की, त्या वृत्तगृहस्थांजवळ त्यांच्या मुलाने हजर राहणं किती गरजेचं होतं आणि तो तर दुर्दैवानं तिथं हजर नव्हताच. त्यांची तब्येत इतकी खालावलेली बघून मी मनात म्हणालो, की मी त्यांचा मुलगा होतो की नव्हतो हे देखील त्यांना समजणं केवळ अशक्य होतं. त्यांच्याजवळ त्यावेळी कोणीतरी हजर असणं किती महत्त्वाचं होतं त्याचा मला साक्षात्कार झाला आणि त्यानुसार त्यांच्या अखेरच्या घटकेपर्यंत इथे त्यांच्या जवळच थांबून राहण्याचा मी निर्णय घेतला.”

‘अमाप संपत्ती साठवणूक करणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत नसते ,तर जी व्यक्ती आपल्या जवळची संपत्ती दुसऱ्यांना वाटून देते ती खरी श्रीमंती होय.’

अजूनही काही

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत