असं किती दिवस राहायचं उदास
हसायचं नाही दिलखुलास
डोळ्याचा केंद्रबिंदू ठेवून
हसत आखायची काळी वर्तुळ
आपल्याच मातीतून
आपलीच खणायची मुळ
असं किती दिवस
राहायचं अलिप्त
बोलायचं …बरंच
शब्दाचं ठेवायचं गुपित
चेहऱ्याच्या सुरकुतीला
हलू द्यायचं नाही
तान मनात डावरली
तिला डोलूच द्यायचं नाही
असं किती दिवस
राहायचं मख्ख
कोसळणाऱ्या धबधब्याला
बांधून ठेवायचं जख्ख
असं किती दिवस
जमेल रागवून
खुल्या मनाला
बळेच ओढून ताणून






