आई

आई

‘आई’ घर उजळून टाकणारी समईतील एक जागा असते ,जेव्हा संपूर्ण घर उजळून जाते तेव्हा तिच भान कुणालाच राहत नाही, पण जेव्हा ती वीझते तेव्हा मग कळतं ,’अरे ,आत्तापर्यंत आपल्याला सुख देत कोण कुणी तरी जळत होतं स्वतःची काळजी न करता आपल्याला प्रकाशमान ठेवत होती, आता ती वीझलीय म्हणूनच हा अंधार झाला आहे!’

लहानपणी तिचं बोट धरून चालायला शिकले खरे ; पण अजूनही आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत कळत नकळत तिच्याच बोटाचा आधार, प्रत्येक संकटातून सोडविणारा तिचाच आशीर्वाद ,माझ्या प्रत्येक कार्याला तिचीच प्रेरणा !

मी नसते तरीही असते माझ्या हृदयात होणाऱ्या प्रत्येक नादमय स्पंदनात डोळ्यातल्या अवघडलेल्या एका थेंबात, माझ्या मन मंदिरातील गाभाऱ्यात पहाटे उगवणाऱ्या सूर्याच्या किरणात ,गहन निळ्या धुक्यात ! ती मला जाणवते तिन्हीसांजेला लावलेल्या नंदादिपाच्या ज्योतीत, धूप अगरबत्तीच्या सुगंधात ,ओठातल्या शुभमकरोतिच्या स्वरात , मावळणाऱ्या त्या सूर्याच्या भव्य लाल प्रतिबिंबात आणि रात्रीच्या काळोखातील रात किड्यांच्या नादमय स्वरातसुद्धा !

‘आई’ ही आईच असते तिला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही जिच्या नावातच आभाळातील ‘आ’ आणि ईश्वरातील ‘ई’ सामावलेला आहे तिच्या प्रेमाची ,अस्तित्वाची तुलना साक्षात ईश्वराशीही करता येत नाही ;तिथे इतर वस्तूंची किंमत काय?

ती पृथ्वीसारखी क्षमाशील आणि महासागरासारखी विशाल ,उदात्त असते. तिच्या प्रेमाला व्यवहाराला व्यवहाराची तुलना कधीच येत नाही केवळ आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणं एवढंच तिला माहीत असतं. परमेश्वराचा दुसरा रूप ,त्या विश्वविधात्याच्या मनातील प्रेम ,करुणा आणि वात्सल्याचा अप्रतिम अविष्कार म्हणजे आई! ज्या कुंतीला नाईलाज असता जन्मताच आपल्या बाळाला पेटीत बंद करून गंगेत सोडावे लागत त्याच कुंतीची कंचुकी करणाला 25 वर्षानंतर आखाड्यात पाहिल्यावर मातृवासल्याने प्रेम-पाझराने चिंब भिजून जाते|

‘कोण पाजील तानुल्यास माझ्या?’ या विचाराने दुःखी झालेली हिरकणी बाळाच्या ओढीने पाय चुकला तर नेमकं मृत्यू येईल अशा रायगड बुरुज ती धैर्याने उतरून तिच्या बाळाकडे येते ! तिच्या या धैर्याला खरोखरच कोणती उपमा द्यावी ?

कवी ग. दि. माडगूळकर म्हणतात आईसारखं दुसरं कोणतंही दैवत या जगात नाही म्हणून तर पाठीवरच्या ‘श्री गणेश’ नंतर ‘अ’ ‘आ’ ‘इ’ शिकायचं असतं .आई तिच्या बाळाला कधीच म्हणत नाही की ‘बाळा मी तुझ्यावर एवढी माया करते’| आई प्रेम बोलून दाखवत नाही तर करून दाखवते. तिच्या वागण्यातून मायेच्या स्पर्शातून ते प्रेम व्यक्त होत ,तिच्या प्रत्येक त्यागातून ते सामोरे येतं ‘घट’ हा शब्द तिच्या प्रेमातील शब्दकोशात नसतो तिची ममता दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाते .

कवी गोविंदाग्रज एका कवितेत म्हणतात हे हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही

जे आनंदातही रडते

दुःखात कसे ते होई?

हे कोणी कुणा सांगावे

आईच्या बाळा ठावे

आईच हृदय जर आनंदात रडत असेल तर दुःखात कसे होईल? खरोखरच मला जर कधी देव भेटला तर माझं सगळं जीवन माझ्या बाळाला दे हे मागणं मी त्याच्याकडे मागील अशी कल्पना करणारी आई नसणं ही अनाथ बालकाच्या नव्हे तर संपूर्ण जगातील प्रत्येक मानवाच्या आयुष्यातील अशी केवढी मोठी उणीव आहे .ती कधीच व कशानेच भरून काढता येत नाही .

आई हे समाजातील प्रत्येक नात्याचं उगमस्थान आहे .या जगात प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम आपलं आपण पाहतो ते आईला या मुखातून बोलायला शिकण्याआधी आपल्या बोबड्या स्वरात अनाहूतपणे निघणारी एक हाक आई !शरीरातील प्रत्येक वेदनाही कळते ती केवळ आईस . मंगेश पाडगावकरांच्या वेड कोकरू या कवितेत या कवितेतील आईची कुस जशी गोड वाटते आवडते .अगदी त्याचप्रमाणे मलाही वाटते हरणाच्या पिल्लाप्रमाणे तिच्या कुशीत जाऊन दडाव आणि आणि ती घटका तो क्षण चिरकालासाठी तेथेच थांबवा थांबव बस तिथेच थांबावा!

तुमच्यासाठी अजून बरच काही..

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत