माझ्या मुलाकडून मिळालेली शिकवण
शिकण्याची उपजतच आवड असलेल्या मुलांपैकी सुदैवाने मी एक होते .मी स्वतः जेव्हा पालक बनले तेव्हा मी मनाशी गृहीत धरलं होतं की, माझ्या दोन्ही मुलांना जर मी चांगलं शिकवलं ,वाचून दाखवलं ,अभ्यास करून घेतला व त्यांच्याशी खेळताना त्यातली गंमत त्यांना दाखवून दिले ,तर ते माझ्या पावलावर पाऊल ठेवून अभ्यासात खूप प्रगती करतील .ते दोघेही मन लावून शिकून ,शिकलेले लक्षात ठेवतील -म्हणजेच लहानपणी मी जशी वागले होते, त्यांचं अनुकरण करतील.
शिवांशी माझी मोठी मुलगी .तिची शिक्षणाबद्दलची आवड तर स्पष्टचज्ञदिसून येत होती. शिकतानाची तिची समज फारच चांगली वाटे. पटकन सगळं ग्रहण करून ती चांगले गुणही मिळवत असे. माझ्या धाकट्या मुलास, विहान यास मी त्याच पद्धतीने शिकवत असे. पण माझ्या लक्षात येऊ लागलं की ,त्याच्या शिक्षकांना, मला व स्वतः विहानलाही त्या शैक्षणिक प्रवासात अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागणार होतं .
माझ्या या प्रेमळ मुलांसाठी माझ्या परीने मी खूप प्रयत्न केले. तो गैरशिस्त अजिबात नव्हता .रोज रात्री झोपायला जाण्यापूर्वी त्यांने गृहपाठ पूर्ण केला होता नं, हे मी बघत असे. तसेच त्याच्या शिक्षकांशी मी सतत संपर्क ठेवून होते .त्याचप्रमाणे शाळेतर्फे काही वेगळी शिकवणी वगैरे असली तर त्यासाठीही त्याचं नाव घालत असे. त्यांने कितीही शर्थीने प्रयत्न केली तरी परीक्षेत व चाचण्यांमध्ये त्याच्या प्रगतीपुस्तकावर ‘सी’ ग्रेड (सर्वात खालचा) हाच शेरा येई. मग ते बघून निराशा, रडारड असं सत्र चालू होत असे. त्याचा अनुत्साह उदासीनता बघून मला चिंता वाटे की ,त्यामुळे त्याची अभ्यासातील गोडी पूर्ण नष्टच होईल की काय !हळूहळू मी स्वतः बद्दल, माझ्या पात्रतेबद्दल साशंक होऊ लागले .
‘कुठे चुकले होते मी माझ्या मुलाला वाढवण्यात?’ मी विचारत पडत असे .त्याच्या मनात यशप्राप्तीची इच्छा मी का नाही निर्माण करू शकले ?मला वाटू लागलं की , ह्याने शाळेत अभ्यास करून चांगले गुण मिळवले नाही तर मोठा झाल्यावर काय बनणार किंवा कसा आत्मनिर्भर होणार -पुढे मागे लग्न वगैरे झाल्यावर कसं काय कुटुंब पोसणार ?
माझा मुलगा विहान जेव्हा सोळा वर्षाच्या तरणाबांड झाला तेव्हा अचानक माझे डोळे उघडले .आम्ही एकदा बाहेरच्या खोलीत बसलेलो असताना फोन खणखणला .माझ्या वडिलांना अचानक तीव्र हृदय झटका येऊन वयाच्या 79 व्या वर्षी त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचा निरोप मिळाला .
‘पप्पा’ म्हणून विहान त्यांना पहिल्यापासून हाक मारत असे .त्याच्या वयाच्या पाच वर्षापर्यंत ‘पप्पा’ हा त्याच्या जीवनातील अविभाज्य भाग होता. माझा नवरा रोज रात्र पाळीवर कामाला जात असे व दिवसा घरी झोपत असे. त्यामुळे पप्पाच त्याला केस कापून आणण्यास, आईस्क्रीम खाऊ घालण्यास घेऊन जात असे .त्याच्याबरोबर बॉल खेळत असे. पप्पा त्याच्या जवळच्या मित्रासारखेच त्याला वाटत .
नंतर माझे वडील काही वर्षांनी त्यांच्या मूळ गावी वास्तव्यासाठी निघून गेले. त्या गावातच ते लहानसे मोठे झाले होते .पण इकडे मात्र विहान त्यांच्याविना फार एकटा पडला. अर्थातच काही काळानंतर तो सावरला म्हणा. नंतर हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागलं की, आजोबांना त्यांच्या वयाच्या जुन्या मित्रांच्या सहवासाची गरज वाटत होती. भूतकाळातल्या आठवणीत त्यांना रमावस वाटत होतं. आजोबांशी वर्षभर फोनवर गप्पा करणे व आजोबांनी अधून मधून आमच्या घरी येऊन त्याला भेटणं हेच विहानसाठी मोठं आकर्षण बनलं होतं आणि त्याचे ‘पप्पा’ देखील त्याला कधीही विसरले नाही हेही तेवढेच खरं!
अंत्यदर्शनासाठी बाबांचं पार्थिव जिथे ठेवलं होतं तिथं आम्ही जाऊन पोहोचलो .मी दारातच उभे राहून बघत होते- तेच नेहमीचे माझे बाबा, पण किती स्तब्ध. काही हालचाल न करता पडलेले होते. मला माहीती असलेले बाबा असे कधीच मला दिसले नव्हते. माझ्या दोन्ही बाजूला आमची दोन्ही मुलं उभी होती. आत मध्ये जाताना विहाननी माझा हात हातात घेतल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. आम्ही तिघांनी एकत्र उभे राहून शांतपणे बाबांच्या मृत शरीरापाशी थोडा वेळ थांबून त्यांचा अंतदर्शन घेतलं व बाजूला होऊन खोलीतच एका भिंतीला लागून बसून राहिलो होतो. दर्शनाला येणाऱ्या त्याच्या शेकडो मित्रांची रांग लागली होती .प्रत्येकाने शोक प्रदर्शित करून एकमेकांना बाबांच्या आठवणी सांगितल्या .काहीजणांनी जवळ येऊन माझं सांत्वन केलं तर कोणी मूकपणे माझा हात हातात घेऊन थोपटून निरोप घेऊन निघून गेले.
अचानक माझ्या लक्षात आलं की, एवढा वेळ माझ्याजवळ असलेला विहान कुठेच दिसत नव्हता .मी मान वरून खोलीभर त्यांना शोधू लागले तर खोलीच्या दाराशी वरंड्यात उभे राहून तो वयस्कर लोकांना जिना उतरण्यात चढण्यात मदत करत होता. कोणी काठीच्या आधारे ,तर कोणी मदत घेऊन, तर कोणी त्याच्या खांद्याचा आधार घेऊन त्याच्या मदतीने आतमध्ये येत होते. त्याच्यासाठी ते सगळेच अनोळखी होते. पण त्याच्या लाडक्या आजोबांना अखेरचा नमस्कार करण्यास ते तिथे आले होते ना!
त्या दिवशी नंतर संध्याकाळी अंत्ययात्रा निघण्याच्या वेळी आयोजकांनी मला विनंती केली की ,खांदा देण्यासाठी आणखी एका व्यक्तीची गरज होती. विहानने ताबडतोब विचारले ,”सर ,मी देतो ना खांदा!”
पण ते आयोजक म्हणाले की, विहानने त्यावेळी माझ्याजवळ व बहिणीजवळ असणं जास्त योग्य होतं. मान हलवत विहान म्हणाला, “मी लहान असताना मला फक्त माझ्या पप्पांनी कडेवर घेऊन खूप फिरवलं होतं. आता त्यांना खांदा देण्याची माझी पाळी आहे.” ते शब्द माझ्या कानावर पडले आणि मी रडू लागले. इतकं रडू येऊ लागलं की,त्यावर माझा ताबाच राहू शकणार नव्हता .
त्या क्षणी मला समजलं की, त्यापुढे माझ्या मुलाला परीक्षेत जरी कमी गुण मिळाले तरी मी त्याला कमी लेखणार नव्हते .मी माझ्या कल्पनेत त्याला जसं घडवण्याची स्वप्न बघत होते ,तशी आता त्याच्याकडून मी मुळीच अपेक्षा करणार नव्हते .कारण माझ्या कल्पना साम्राज्यातला माझा विहान, या परिपक्व विचारांच्या विहानच्या पासंगालाही पुरला नसता. त्याच्या मनात आलेली अनुकंपा ,दया, प्रेम व दुसऱ्याबद्दल वाटणारे सहानुभूती म्हणजे परमेश्वराकडून त्याला मिळालेली फार मोठी देणगी होती. केवळ पुस्तकी ज्ञानातून त्याला या गोष्टी शिकण्यास मिळाल्या नसत्या. पदवीचा कागद विहानच्या या गुणांची जगाला ओळख करून देऊ शकला नसता.
आता तो वीस वर्षाचा तरुण मुलगा आहे. जिथे जातो तिथे तो त्यांच्यामध्ये वास करणाऱ्या प्रेमळ भावनेचा, सहानुभूतीच्या गुणांचा व विनोद बुद्धीचा त्याच्या सहकार्यामध्ये प्रचार करत असतो. आज मी स्वतःलाच प्रश्न करत असते.” शास्त्र -गणित हे विशेष शिकूनच का काही विशेष फरक पडत असतो ?एखादी तरुण व्यक्ती जर तिच्यापरीने होईल तेवढे सत्कार्य करत असेल तर मग तिला मनःपूर्वकपणे ‘ए’ ग्रेड (उत्तम गुण) दिलीच पाहिजे .हो ना?”


