निसर्ग: आपला मित्र

हिरव्या रानात पिवळ्या उन्हात

जीव उधळून भुलून जा |

आतून आतून फुलत फुलत

विश्वासानं चालत रहा ||

ही शिकवण दुसरं तिसरं कोणीही देत नाही स्वतः सप्तरंगाची उधळण करणारा निसर्ग राजाच देतो त्याची मानवाशी असलेली नाती अपरंपार आहेत . तो मानवाचा मित्र आहे तो कलावंत आहे , तो जादूगार आहे , नव्हे तर तो मानवाचा गुरु देखील आहे निसर्ग हे कधीही न संपणारे पुस्तक आहे .म्हणूनच गाडगेबाबांनी गो. नी. दांडेकरांनी सांगितले आहे.

‘येकलाच हिंडा देवानं हे जगाच एवढं मोठ्ठं पुस्तक लिहिलं आहे ते मस्त वाचत हिंडा’.

माणूस निसर्गाचं अपत्य आहे त्याला आपल्या इतर भावंडाविषयी ओढ असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच तो निसर्गाकडे आकृष्ट होतो .निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट स्नेह संबंध फार पुरातन काळापासून आहे अगदी अनादिकालापासून निसर्ग हा मानवाचा जिवलग सोबती आहे .निसर्गाच्या कुशीत विसणाऱ्या ऋषीमुनींनाचं दिव्य अमर असे काव्य सुचले. एकापाठोपाठ एक वेद ऋचा निर्माण होऊ लागल्या. आकाशातील बदलणारी रंग पाहूनच कवीच्या प्रतिभेला बहर आला .याचाच दाखला म्हणून कवी बा.भ. बोरकर म्हणतात

‘ हिरवळ आणिक पाणी,

तेथ मजला स्फूरती गाणी’

तर कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांना चंद्र हा ‘स्वप्नाचा सौदागर ‘ वाटतो .निसर्गाच्या या पवित्र वातावरणात विचारवंतांनी तत्व चिंतन केले त्यातूनच उपनिषदे ,श्रुती ,स्मृती या पवित्र ग्रंथाचा जन्म झाला .

या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे तो त्यांची भूक भागवतो . तहान शमवतो. मंद ,मधुर, वायु लहरींनी त्यांचा श्रम परिहार करतो. सुगंधित फुलांनी त्यांचे शांत प्रांत जीवन सुगंधित व उल्हासित करतो .थकल्या भागल्या जीवाला सावली देतो. उन्हाचा त्रास झाला तर थंड पाण्याचा शिडकावा करतो. मानवाला निवारा उभारण्यासाठी लाकूड देतो .वस्त्रासाठी कापूस देतो अन्य शिजवण्यासाठी सरपण देतो .काय देत नाही तो निसर्ग|

‘निसर्गाची विविध लेकरे’ मानवाला जीवन देत असतात. कड्या कपाऱ्यावरून धावत जाणारी आणि असमंत समृद्ध व सर शामल करणारी सरिता ही दातृत्वाचा अमोल संदेश आपल्या कृतीतून देत असते .वृक्षाबाबत एक सुंदर संस्कृत सुभाषित आहे .

छायामनस्य कुर्वन्ति निष्ठांन्ति स्वयंमातये

फलन्यपि पराथाय वृक्षा सत्पुरुषा :इव|”

जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहतात ,पण इतरांना सावली देतात ज्याची फळे फुले ही दुसऱ्यांसाठी असतात ,असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सदपुरुषासारखे भासतात. अनेक वृक्षांची औषधी पाने सुगंधी फुले ती सुद्धा दुसऱ्यांच्या सेवेसाठीच असतात. हजारो पक्षी वृक्षाच्या आश्रयाने आपले घरकुल उभारतात वादळात वृक्षाच्या कुशीत विसरतात .सूर्य स्वतः अग्निदिव्य करतो व सृष्टीला प्रकाश देतो .जणू तो मानवाला त्याच्या अवतीभवतीच्या दारिद्र्याचा दुःख देण्याचा अंधार नाहीसा करण्यास स्वतःच्या आदर्शातून सुचवत असतो .श्रीमंताच्या महालावर आपले चांदणी पसरवणारा चंद्र गरिबाच्या चंद्रमौळी झोपड्यांना ही चंदेरी मुलामा चढवतो .अंधाऱ्या रात्री आकाशात चमचमणारे तारे’ तम अल्प द्यति बहु ‘असे सुचवत नाही का? हिमालयाची भव्यता व उत्तुंगता सागराची अथांगता, आकाशाची विशालता या साऱ्या गोष्टी नसत्या तर मला वाटते माणसाला काहीतरी भव्य दिव्य करावे अशी प्रेरणा कधी मिळालीच नसती |

ह निसर्गातील प्राणी जातही उपदेश करण्यास मागे नसते ”अरे मित्रा, अडचणी अपयश येणारच त्यावर मात करायची” हा संदेश जाळे विणण्यासाठी धडपडणारा कोळी आपल्याला देत असतो .”चिकाटी असली की असाध्य ते साध्य करता येते बघा “हे आपल्याला झाडावर लोबकळणारे मधमाशांचे भले मोठे पोळे सांगत असते. दहा जणांच्या सांघिक प्रयत्नातून एवढा मोठा गव्हाचा दाणा ही वाहून नेता येतो ही सहकाराची अमूल्य शिकवण मुंग्या देतात. तर ‘गात्रे थकल्यास मरण स्वीकारणे’ पण परावलंबी होऊन लाचारीचे जीवन जगू नये ही स्वाभिमानाची शिकवण वनराज देतो शेवटी काय तर निसर्गच आपल्याला सर्व काही देतो पण आपण मात्र काहीच देत नाही याबाबत विंदा करंदीकर म्हणतात

“देणाऱ्याने देत जावे ,घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याची हातही घ्यावे”

एकूणच काय तर हा बहुगुणी व उपदेशी निसर्ग मानवाचे हितच पाहत असतो पण हा कृतज्ञ माणूस मात्र भरमसाठ वृक्षतोड करून या निसर्ग रूपी सुंदर बाहुल्याला प्रदूषण रुपी राक्षसाचा काळीमा लावत आहे. हे थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे शेवटी आपण या हितचिंतककरकासाठी विधात्याकडे एवढीच प्रार्थना करू

“निसर्ग संपत्ती सदा घडो|

मंजुळ पक्षी कान कानी पडो ||

कलंक प्रदूषणाचा झडो |

वृक्षतोड सर्वथा न आवडो ||”

तुमच्यासाठी अजूनही बरच काही….

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत