विश्वास
सीमा घरातील शेंडेफळ होते. तिला एक थोरला भाऊ व बहीण होते. तेव्हा तिचे वडील सतत आजारी असल्याकारणाने अंथरुणालाच खिळलेले असत व तिची आई शिवणकाम करून घर चालवत असे. रात्र रात्र ती जुनाट पाय मशीनवर बसून मिणमिणत्या उजेड्यात कपडे शिवत असे .घरातील धान्य संपत येवो की, शेकोटी पेटवण्यासाठीची लाकडं कमी पडो, तिच्या तोंडातून चुकूनही तक्रारीचा सूर निघत नसे. रात्रभर जागून पहाट होईपर्यंत तिच्या शिवणकामात कधीही खंड पडत नसे.
एके वर्षी हिवाळांच्या दिवसांत त्यांच्यावर खूप मोठा बिकट प्रसंग आला होता . ज्या दुकानांमधून सिमाच्या आईने शिवण यंत्र विकत घेतले होते, त्याच्या मालकाकडून एक पत्र आलं होतं. त्यात लिहिलेलं होतं की, मशीनच्या कर्जाचे तुंबलेले हप्ते जर भरले गेले नाहीत तर, दुसऱ्या दिवशी दुकानातील कामगार येऊन मशीन घेऊन जाणार होते . आईने ते पत्र मोठ्याने वाचल्यावर सीमा पूरती घाबरून गेली .आता त्यांचे हाल होणार ,भुकेने ते अर्धमेले होणार, या भीतीने तिच्या बालबुद्धीनुसारच ती विचार करू लागली. पण तिची आई मात्र अजिबात घाबरून गेलेलीच वाटत नव्हती. ती शांतपणे तिच्या उद्योगात मग्न होती. बिचारी सीमा! कसं होणार होतं हाच विचार करत रडून रडून शेवटी झोपी गेली. देवाने आज त्यांच्यावर कधीही अन्याय केलेला नव्हता व त्यावेळीही तो करणार नाही असं ती खात्रीने म्हणत होती. ते शिवणाचं मशीन त्यांच्याजवळच राहू देण्यासाठी देवबाप्पा कशी काय त्यांची मदत करणार होता त्याचं तिच्या बालमनाला काही केल्या आकलन होत नव्हतं .
उदरनिर्वाहाचं एकुलतं एक साधन त्यांच्यापासून हिरावून घेऊन जाण्यास ज्या दिवशी दुकानातले कामगार येऊन धडकणार होते ,त्या दिवशी स्वयंपाकघराच्या मागच्या दारावर अचानक थाप पडली .ती दुष्ट माणसंच आलेली असणार या विचाराने सीमाची घाबरगुंडी उडाली पण त्या लोकांच्या ऐवजी व्यवस्थित नीटनेटके कपडे घातलेला एक माणूस त्यांच्या दारात उभा असलेला दिसला. त्याच्या कडेवर एक लहान बाळ होतं .
तिच्या आईच्या नावाची चौकशी त्यांनी केली. सीमाने हो म्हटल्यावर तो म्हणाला, ” मी आज जरा अडचणी सापडलोय आणि बाजारामधल्या औषधविक्रीच्या व किराणा मालाच्या दुकानदारांनी मला तुमच्याबद्दल सांगितलय की, तुम्ही खूप प्रामाणिक व सुस्वभावी बाई आहात. आज सकाळी अचानक माझ्या पत्नीला तातडीने हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलंय आणि या गावात आमचे कोणीच नातलगही राहत नाहीत. मला तर माझा दातांचा दवाखाना उघडणं भाग आहे. पण मग आमच्या या बाळाला कुठे ठेवायचं तेच कळत नाहीये .काही दिवसांसाठी तुम्ही त्याची काळजी घेऊ शकाल का प्लीज?” पुढे तो असेही म्हणाला ,”वाटलं तर मी तुम्हाला थोडी रक्कम आगाऊच(ॲडव्हान्स) देऊन ठेवतो .”आणि त्याने खिश्यातून दहा हजार रुपये काढून सिमाच्या आईच्या हातावर ठेवले .
आई म्हणाली ,”हो, हो! मी नक्कीच तुमच्यासाठी अतिशय आनंदाने हे काम करण्यास तयार आहे” असं म्हणून तिने त्याच्या कडेवरून बाळ उचलून घेतलं देखील होतं. तो मनुष्य निघून गेल्यावर ,ओघळणाऱ्या अश्रूंनी भरलेला चेहरा माझ्याकडे वळवत आई सीमाला म्हणाली,” बघ, मला खात्री होतीच की, माझा परमेश्वर माझं हे मशीन त्या लोकांना घेऊन जाऊ देणारच नव्हता.” तिचा चेहरा आगळ्याच आनंदाने चमकून उठलेला होता.


